‘अज्ञानामुळे आलेल्या अडचणी दूर करण्यात तंत्रज्ञानामुळे यश’   

डॉ. माधव गाडगीळ यांचे मत

पुणे : जंगलातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती जगापर्यंत पोहचविण्यात अज्ञानाचा अडसर होता.  मात्र,  गुगल लेन्सद्वारे वनस्पतींबाबत सहज माहिती उपलब्ध होत गेली. गडचिरोली भागातील आदिवासींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वनस्पतींची छायाचित्रे टाकून त्याची माहिती संकलित केली,  बाजारपेठ मिळवून अर्थार्जनही केले. अज्ञानामुळे आलेल्या अडचणी तंत्रज्ञानामुळे दूर झाल्या, असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी 
व्यक्त केले.
 
डॉ. माधव गाडगीळ आणि  प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर लिखित ’सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत झाला. प्रकाशन माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गाडगीळ बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त समीर कुर्तकोटी, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, सदुराम मडावी, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, धन्यकुमार चोरडिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
 
डॉ. गाडगीळ म्हणाले, अनुभवजन्य ज्ञान आदिवासी तरुणांकडे आहे, त्यांच्याकडे शास्त्रीय ज्ञान नव्हते. त्यासाठी जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र जीव जाती ओळख असा अभ्यासक्रम गरजेचा होता. म्हणून आम्ही त्यांच्या ज्ञानाला चौकटीत बांधले.रावत म्हणाले की, आदिवासींच्या भाषेतील ज्ञान एआय आणि गुगलवर येण्यास लवकर सुरुवात होईल असे सकारात्मक वातावरण आहे. तली. चैत्राम पवार म्हणाले, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय वारसा जपण्यासाठीचा आदर्श निर्माण केल्यामुळे बारिपाडाची ओळख निर्माण होत आहे.
 
डॉ. विजय एदलाबादकर म्हणाले, प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर सिद्ध झालेली आणि अनुभवसंपन्न ज्ञानावर आधारित प्रस्तुत मार्गदर्शिका जमिनीवर ‘वन कार्य योजना’ तयार करणार्‍या कार्यकर्त्यांना थेट उपयुक्त पडावी, अशा पद्धतीने लिहिलेली आहे. त्यामुळे ती ग्रामसभांच्या वन संसाधनांशी संबंधित ग्रामविकास आराखड्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेल.सूत्रसंचालन डॉ. प्राची क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी केले तर आभार रोहिदास मोरे यांनी मानले.

Related Articles